जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२४ । सोमवारी दि. 16 सप्टेंबर रोजीची ‘ईद ए मिलाद’ ची सुट्टी रद्द करून ती 18 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात दिली असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी काढली आहे
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सबब, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात आली असल्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.