गणपती मांगल्याचे, तर गौराई, महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक ; रोहिणी खडसे
रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी गौराईची प्रतिष्ठापणा
जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । गणपती बाप्पांच्या आगमनानंतर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते. गौरीला आदीशक्तीचे रुप मानले जाते. गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी गौरी आवाहनाच्या दिवशी गौराई ची स्थापना करण्यात आली. गौराईचे वाजतगाजत आगमन झाल्यानंतर गौराईला वस्त्रे नेसवून, साज शृंगार करून विधिवत गौराईची स्थापना करण्यात आली.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या
गणेशोत्सवात गौराईला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील विविध भागात, विविध पद्धतीने गौराईची स्थापना करून पूजन केले जाते. अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. या दिवशी ती एकटी नाही तर दोघी बहिणी येतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी या नावाने त्यांना ओळखले जाते. गौरीला गणपतीची आई अर्थात पार्वती म्हणून ओळखले जाते तर दुसरी ही माता लक्ष्मी थोरली बहिण मानली जाते. तसेच यादिवशी महालक्ष्मी पूजा केली जाते.
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. एका पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.
गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. गौरी गणपती चरणी सर्वांच्या निरामय मंगलमय सुखदायक आयुष्यासाठी प्रार्थना केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा ताई खडसे, माजी सरपंच पुष्पा ताई खेवलकर, कोकिळा ताई खेवलकर आणि महिला उपस्थित होत्या.