तलावात बुडत असलेल्या दोघांना मिळाले जीवदान: सुकळीच्या तरुणाची कौतुकास्पद कामगिरी!
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती!’ या म्हणीचा प्रत्यय मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे काल पोळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेने आला.
पोळा सणानिमित्त काही तरुण सुकळी शिवारातील पाझर तलावात बैलांना आंघोळीसाठी घेऊन गेले होते. या दरम्यान नितीन काशिनाथ आमोदकर हा 23 वर्षीय तरुण बैलांना आंघोळीसाठी तलावात पोहत असतांना खोलीचा योग्य अंदाज न आल्याने बुडू लागला. शेजारी पाण्यात पोहत असलेला दुसरा तरुण प्रदीप खुशाल तायडे यांच्या ही बाब लक्षात येताच नितीनला वाचविण्यास धावला खरा परंतु त्या ठिकाणी पाण्याची खोली जास्त असल्याने प्रदीप ला पण पोहता आले नाही आणि दोघेही पाण्यात बुडू लागले.सुदैवाने तलावाकाठी असलेल्या विजय पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेत दोघांनाही बुडातांना वाचवले.
विजय देविदास पाटील यांनी ऐनवेळी दाखविलेल्या प्रसंगावधान व धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.विजय पाटील हे सुकळी येथील माजी महिला सरपंच कांताबाई पाटील यांचे सुपुत्र आहे. तलावाची दुरुस्ती तसेच शेतकरी यांनी गाळ उपसा केल्यामुळे तलावाची खोली वाढलेली असतांना पाण्यात खोलीचा अंदाज येत नाही. दरम्यान दोघांचेही कुटुंबियांकडून विजय पाटील यांचे आभार मानले तसेच परिसरातून विजय पाटील यांनी धाडस दाखवून दोघा युवकांना जीवदान मिळवून दिले यामुळे कौतुक होत आहे.