मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, दोघे पोलिसांच्या ताब्यात ; भडगावातील घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२४ । भडगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील साईनगरामध्ये मुलाचा अपहरणाचा प्रयत्न सतर्कतेमुळे फसला. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अविनाश गुलाब पाटील व गोकुळ देविदास पाटील असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव असून या दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहेत प्रकार?
शहरातील साईनगर येथील रहिवासी व पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील टेक्निकल माध्यमिक विद्यालयातील शिक्षक जितेंद्र रायचंद परदेशी यांचा मुलगा पार्थ परदेशी हा शहरातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत ज्युनियर केजीत शिक्षण घेतो. संशयित आरोपी पार्थच्या अपहरणासाठी शाळा परिसरात पाळत ठेवून होते. दरम्यान, भडगाव पेठमधील अविनाश गुलाब पाटील व गोकुळ देविदास पाटील या दोन्ही संशयित आरोपींनी शाळेत जाऊन पार्थला घेण्यासाठी आलो आहोत, असे संबंधित शिक्षकांना सांगितले.
परंतु, २९ रोजी पार्थ आजारी असल्याने तो घरीच होता. दरम्यान, मुलाला घेण्यासाठी आलो आहोत असे सांगण्याऱ्यांचा हा मुलगा शाळेत आला नसल्याने शिक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी या दोघांना तेथेच थांबवून ठेवले. दरम्यान, तत्पूर्वी संशयित आरोपींनी पार्थचे वडील जितेंद्र परदेशी यांना मुलाच्या अपहरणाचा फोन केला. परंतु, पार्थ हा घरीच असल्याने पार्थचा अपहरणाचा डाव फसला. तर शिक्षक व इतर पालकांनी संशयित आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी पार्थचे अपहरण करण्याचा आमचा डाव होता, अशी कबुली दिली.
संशयित आरोपींचा फोन आला तेव्हा शिक्षक जितेंद्र परदेशी शाळेत होते. धमकीचा फोन येताच ते तत्काळ भडगावला घरी पोहोचले व त्यांनी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, जितेंद्र परदेशी हे घुसर्डी खुर्द येथील मूळ रहिवासी असून पार्थ हा शेतकरी सहकारी संघाचे संचालक रायचंद परदेशी यांचा नातू आहे. या घटनेचा तपास पो.नि. पांडुरंग पवार यांच्या आदेशान्वये हेडकॉन्सटेबल प्रदिप चौधरी करत आहेत.