अनुकंपा भरती : जळगावच्या संवेदनशील नेत्यामुळे मिळाला राज्यातील ४५० कुटुंबांना न्याय
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । नोकरीच्या कालावधीत एखाद्या कर्मचार्याचे निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबाच्या चरीतार्थाकरता, त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी द्यायची पद्धत आपल्याकडे सरकारी संस्थांमध्ये आहे. अशाप्रकारे नोकरी देण्यात येते तेव्हा त्यास अनुकंपा तत्त्वावरील नोकरी असे म्हणतात. मात्र अनुकंपा अंतर्गत भरती होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागते, असे अनेकांचा अनुभव आहे. मात्र एखाद्या संवेदनशील राजकारण्याने ठरविले तर हा विषय देखील सहजतेने मार्गी लागू शकतो. असाच काहीसा अनुभव राज्यातील ४५० अनुकंपा धारकांना आला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या संवेदनशील नेत्याने ४५० कुटुंबांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून दिला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या इतिहासात अनुकंपा भरती प्रक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात पुर्णत्वास आली. गेली २० वर्ष विविध आंदोलने,’ धरणे तसेच उपोषणाच्या माध्यमातून अनुकंपा धारक न्यायेच्या प्रतिक्षेत होता. अखेर ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ४५० अनुकंपा धारकांना नोकरी मिळाली. तर ४५० कुटुंबियांचे पुनर्वसन त्यांनी केले. याशिवाय प्रतिक्षा यादीतील उर्वरित १०० ते १५० अनुकंपा धारकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासनास निर्देश दिले. त्यानुषंगाने कार्यवाही देखील सुरू आहे. म्हणजेच जवळपास ६०० कुटुंबियांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.
अनुकंपाकृती समितीच्या वतीने सत्कार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनुकंपाकृती समितीच्या वतीने पाळधी येथे जाहीर सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करुन ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानण्यात आले. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या अनुकंपा धारकांनी पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.