⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावसह राज्यातील या भागात अवकाळीची शक्यता, उकाड्याने दिलासा मिळणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून घोंगावत असलेलं अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. एकीकडे राज्यातील अनेक ठिकाणी आज सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर जळगावमध्ये २७ एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जळगावमध्ये राज्यातील सर्वाधिक ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे उकाड्यापासून जळगावकर हैराण झाले आहे. तर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने उकाड्यापासून काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर, अरबी समुद्रावर मध्यम प्रकारचे ढग होते. सकाळी मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भाग अंशतः ढगाळलेले होते. येत्या पाच दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता आहे.

रायगड, पुणे जिल्ह्यामध्ये सोमवारी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार, कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी तर बीड-परभणीमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा वेगही अधिक असू शकेल. अकोला, बुलडाणा येथे मंगळवार ते गुरुवार तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो.