जळगावातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पोलंडमधील ‘तो’ किस्सा सांगितला; काय म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगावमध्ये ‘लखपती दिदी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. माझी नजर जिथपर्यंत जाते तेथेपर्यंत आई-बहिणींचा महासागर दिसत आहे. हे दृश्य मनाला आनंद देणारे असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच यावेळी संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील किस्सा सांगितला.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
महाराष्ट्रातील संस्कृतीचा डंका जगभरात वाजला आहे. मी युरोपमधून पोलंडला गेले. त्या ठिकाणी मला महाराष्ट्राचे दर्शन झाले.महाराष्ट्राची संस्कृती दिसली. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूपच सन्मान करतात. पोलंडच्या राजधानीत त्यांनी कोल्हापूर मेमोरियल उभारले आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी बनवले आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्काराचे दर्शन मला सर्वत्र होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
लाखो जण बचत गटांसोबत
लखपती दिदीचं महासंमेलन होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटींहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांतून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळेल. सर्वांना माझ्या शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.