⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | विधानसभा निवडणुकीतही घुमणार ८४ वर्षांच्या तरुणाच्या तुतारीचा ‍आवाज!

विधानसभा निवडणुकीतही घुमणार ८४ वर्षांच्या तरुणाच्या तुतारीचा ‍आवाज!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २९ जुलै २०२४ | लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुकाबला असणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या आहेत. शरद पवार नावाच्या ८४ वर्षांच्या तरुणाने भाजपाला धोबीपछाड दिला, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

यंदाची विधानसभा निवडणूक जरा हटकेच ठरणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय फुट पडली आहे. महाराष्ट्राचे राजकारण ज्या शरद पवारांशिवाय पूर्ण होवूच शकत नाही त्या शरद पवारांकडे ना स्वत:चा पक्ष आहे ना चिन्ह! ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांचं पक्ष आणि चिन्ह गेलं, निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवारांना दिले. तीच तुतारी पवारांनी लोकसभा निवडणुकीत फुंकली आणि त्यांच्या पक्षाने १० पैकी ८ खासदार निवडून आणत भाजपाला जोरदार धक्का दिला. हिच तुतारी विधानसभा निवडणुकीत वाजणार का? आकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्रावर प्रभाव असलेले नेते म्हणून शरद पवार ओळखले जातात. शरद पवार ८४ वर्षांचे आहेत. पाच दशकांहून अधिक काळाचा शरद पवारांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे. ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत, शरद पवार ‘फॅक्टर’ महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. ते नेहमीच त्यांच्या नवनव्या रणनीतीने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. प्रचंड मुत्सद्दीपणा, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता या गुणांमुळे ते राजकारणाच्या पटलावर भल्याभल्यांना धोबीपछाड देतात.

आजपर्यंतच्या राजकीय जीवनात शरद पवार यांनी अनेक संकटाच्या काळात मोठ्या धैर्याने सामोरे गेले. त्यांच्या राजकीय जीवनातील चढउतार आजतायत सुरूच आहेत. पण शरद पवार कायम एखाद्या पोलादी भिंतीसारखे उभे राहिले, आलेल्या संकटांवर त्यांनी कायमआपल्या राजकीय चातुर्याने मात केल्याने उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. ५० वर्षांच्या राजकारणात अनेक वेळा त्यांना शून्यात जावं लागलं आणि तरीही ते जिद्दीने पुन्हा उभे राहिले. आपल्या कारकिर्दीत अशा प्रकारे अनेकदा त्यांनी प्रचंड जोखीम पत्करून शून्यातून सारं काही उभं केलेलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘पॉवर’बाज खेळी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना ‘युती’ला स्पष्ट कौल मिळाला होता, पण इथे पवारांच्या राजकीय डावपेचांनी खेळ बदलला. राजकीयदृष्ट्या, वैचारिक बैठकीनं एकमेकांच्या विरुद्ध असणारे सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा मुत्सद्दीपणा शरद पवारांनी यशस्वी करुन दाखविला. २०१९ च्या या महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यानं पवारांच्या निवडणुकीतल्या कौशल्यांबरोबरच राजकीय डावपेचही पाहिले. विशेष म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी संपली, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्ध्याहून जास्त फोडून भाजपाने स्वतःच्या पक्षात विलीन केला होता. तरीही शरद पवार हिंमत हरले नाहीत.. त्यांनी आपल्या लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी लढण्याची प्रेरणा दिली आणि राष्ट्रवादी पुन्हा उभी केली. केवळ पक्ष उभाच केला नाही तर पक्षाला सत्तेच्या खुर्चीत देखील बसविले. मात्र नंतर भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणात पुतणे अजित पवार यांना हाताशी घेवून भाजपाने पवारांच्या किल्ल्याला सुरूंग लावला.

शरद पवारांची नवी इनिंग

अजित पवारांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फाडून स्वत:ची वेगली चुल मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं. तर शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ असं नाव देण्यात आलं. त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तसे बघितले तर २०१९ ला तर पक्षातील अनके बड्या नेत्यांनी साथ सोडूनही फक्त शरद पवारांच्या करिष्म्यावर पक्षाने ५४ आमदार निवडून आणले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही स्थापन केली. परंतु अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि शरद पवारांकडे अवघे १२ आमदार राहिले आहेत. मात्र ते लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही बाजी पलटवतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

चक्रव्ह्यूव भेदण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर

लोकसभेतील चुका विधानसभेत टाळण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. महायुतीकडून विविध घोषणांचा पाऊस होत असून महाविकास आघाडी सरकारवर टीका करून त्यांच्या योजनांवर हल्लाबोल करत आहे. भाजपाचा चक्रव्ह्यूव भेदण्याची जबाबदारी स्वत: शरद पवारांनी खांद्यावर घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी कंबर कसल्यामुळे त्यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. जसे त्यांचे भर पावसातले भाषण गाजले होते. अगदी तसाच सळसळता उत्साह त्यांच्या प्रत्येक दौऱ्यानंतर दिसून येत आहे.

निष्ठावान नेत्यांनी फळी

शरद पवारांकडे जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या निष्ठावान आमदारांसह रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारखे युवा नेत्यांची खंबीर फळी आहे. अजित पवारांनी भाजपासोबत जात वेगळी चूल मांडल्याने राष्ट्रवादी फुटली. मात्र यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत शरद पवारांबद्दल प्रचंड सहानभूती निर्माण झाली आहे. ८४ वर्षाचा हा तरुण योद्धा अजूनही या वयात संघर्ष करतोय यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शरद पवार यांच्याविषयीचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.

मराठा समाज शरद पवारांच्या पाठिशी!

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भुमिका निर्णायक ठरली. मराठा सामाजाच्या नाराजीचा फटका भाजपाला बसला, याची जाणीव आता संघ व भाजपाला झाली आहे. यामुळे मराठा आरक्षणावर भाजपाने अत्यंत सावध भुमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाला चांगलीच धार आली. विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रमुख मुद्दा ठरणार यात शंका नाही.

author avatar
Tushar Bhambare