धक्कादायक! आदिवासी कुटुंबातील तिघा भावंडांचा मृत्यू, कुटुंबाकडून लपवालपवी
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२४ । चोपडा तालुक्यातील कमळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील एकाच आदिवासी कुटुंबातील तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून अंजली सीताराम बारेला (वय १२), रोहित सीताराम बारेला (वय १०), बादल सीताराम बारेला (वय १५, सर्व रा. कमळगाव, ता. चोपडा) अशी तिघा मृत बालकांची नावे आहेत.
एका शेतात राहणाऱ्या या आदिवासी पावरा कुटुंबाकडे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी या बालकांना विषबाधा झाल्याचा संशय आहे. पाच वर्षांची मुलगीही गंभीर असून, एकूण सात जणांवर अडावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतरही कुटुंबाकडून लपवालपवी सुरू होती. त्यामुळे या बालकांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की घातापातामुळे ? असा प्रश्न उभा राहिला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून तेथील बालकांना उलट्या, मळमळ, ताप, पोटदुखी असा त्रास होत होता. त्यातील अंजली व रोहित या बालकांचा गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यविधी झाल्यावर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बादल नावाच्या मुलाचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांनाही उलट्या, मळमळ, ताप, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांनी अडावद आरोग्य केंद्रात धाव घेतली. यात पाच महिन्यांची आरती सीताराम बारेला आणि सावन बारेला या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
तर मुकेश गणेश बारेला (वय ८), शीला गणेश बारेला (वय ३०), रेखा मुकेश बारेला (वय ३५), सुनीता गणेश बारेला (वय १७), सोनाली गणेश बारेला (वय ११), दीपाली गणेश बारेला (वय १०), सावन लकड्या बारेला (वय ५) या मुलांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची लक्षणे पाहता त्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज चोपड्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रोहित व अंजली या दोघांना दफन केले होते. आता दोघांचेही मृतदेह बाहेर काढून आज रविवारी शवविच्छेदन केले जाणार आहे.