जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । कॉंग्रेसला धक्का देणारा एका मोठा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली होती. यावरून मोदी सरकारने कॉंग्रेसला घेरले आहे. केंद्र सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यांनी पोस्ट केले, “25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून, हुकूमशाही मानसिकतेचे प्रदर्शन करून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. लाखो लोकांना कोणतीही चूक न करता तुरुंगात टाकण्यात आले आणि प्रसारमाध्यमांचा आवाजही कमी झाला. 1975 च्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या महान योगदानाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.