जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । जळगाव जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार ते पोलिस शिपायांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया सुरु होती. २५० पोलिस शिपायांच्या बदल्या केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा ६०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. ६०९ पोलिस कर्मचारी प्रशासकीय बदलीसाठी पात्र होते. त्यात बहुतांश कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, काही जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मंगळवारी सहाय्यक फौजदार ते पोलिस नाईक पदापर्यंतच्या ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही प्रक्रिया झाल्यानंतर बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले
वर्षानुवर्षे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची शहराबाहेरील पोलिस ठाण्यात बदली निश्चित मानली जात होती. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७४ सहाय्यक फौजदारांचा समावेश आहे. तर १७४ हेड कॉन्स्टेबल, ६३ पोलिस नाईक, १८९ पोलिस कॉन्स्टेबल, ६६ महिला पोलिस व ४३ चालकांचा समावेश आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी तीन पसंतीक्रमानुसार अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोख नखाते, कविता नेरकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची बदलीबाबतच्या मुलाखती पार पडल्या.