जळगावात पावसाने घेतला ब्रेक; तापमानात किंचित वाढ होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२४ । जून महिन्यात पाठ फिरविलेल्या मान्सूनने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक ठिकाणी दमदार कमबॅक केलं. जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसपासून पावसाने हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, आज राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून यापार्श्वभूमीवर काही जिल्हांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मात्र जळगावात आज पावसाने ब्रेक घेतला आहे.
हवामान खात्याने राज्यात जून महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र गेल्या महिन्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील जून महिन्यात हवा तसा पाऊस झाला नाही. कोणत्या तालुक्यात हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाउस पडला होता, तर काही ठिकाणी पाऊस पडलाच नव्हता.पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सून सक्रिय होऊन चांगला पाऊस झाला. यामुळे पेरण्या मार्गी लागल्या. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाच्या सरी बसरल्या. मात्र आज जळगाव जिल्ह्यात पावसाने ब्रेक घेतला आहे.
कसा राहील आजचा दिवस?
जळगावात आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उकाडा जाणवू शकतो. मंगळवारी जळगावचे तापमान ३० पर्यंत होते.
राज्यात कुठे पडणार पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती नागपूरसह चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगरसह, नंदुबार जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात अधून मधून हलका पाऊस पडू शकतो.