जळगाव जिल्हा

नियमित योगाभ्यास – सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली ; डॉ केतकीताई पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपली नियमित ओपीडी संपवून डॉक्टरताई आपला मेलबॉक्स तपासत होत्या. तेवढ्यात शिक्षिका असलेली लता नावाची त्यांची शाळेतील मैत्रीण धापा टाकत आली. बरीच दमलेली होती. कामाचा, घरातील जबाबदारीचा ताण तिच्या चेहऱ्यावर अगदी दिसत होता. “अगं…लता किती दिवसांनी भेटते आहेस? कशी आहेस? किती दमली आहेस काय होतंय तुला”? डॉक्टरताईंनी विचारले. “काही नाही गं…नेहमीचंच खूप थकवा आलाय बघं…आजकाल पटकन दमते माझं मलाच काय झालंय ते कळत नाही. बघ जरा मला काही आजार तर नाही ना…” काहीशा काळजीनेच लताने ताईंना विचारले “तू काहीच काळजी करु नकोस मी चेक करुन लगेच सांगते तूला” डॉक्टताईंनी दिलासा दिला. लताची व्यवस्थित तपासणी झाली. “तूला काहीही झाला झालेले नाही. फक्त जरा स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे” असं ताईंनी तिला सांगितलं.

“म्हणजे??”
“आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. आपण महिला नेहमीच आपल्या कुटुंबाला, कामाला प्राथमिकता देतो. स्वत:कडे लक्ष देण्याची आपल्याला अजिबात गरज वाटत नाही. पण यावेळच्या योगदिनाची मध्यवर्ती संकल्पनाच “ महिला सक्षमीकरणासाठी योग” अशी आहे. त्यामुळे आतातरी आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राखण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.” “खरंय गं…याचा मी कधी विचारच केला नाही, तू या योगदिनानिमित्त आमच्या शाळेत येशील का ? त्यानिमित्ताने सर्वांनाच माहिती मिळेल” लताने प्रस्ताव ठेवला आणि डॉक्टरताईंकडून तो मान्य करुन घेत लता घरी गेली. दुसऱ्या दिवशी लता आपल्या बरोबर डॉक्टरताई आणि त्यांच्या परिचयातील योगप्रशिक्षकांना घेवून आपल्या शाळेत गेली. डॉक्टरताईंनी सर्वांना योगदिनानिमित्त माहिती दिली. आपल्याबरोबर आलेल्या योगप्रशिक्षकांकडून सर्वांचा योगाभ्यास करवून घेतला.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योगदिन कसा सुरु झाला त्याची माहिती दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यांसारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. पुढे अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या ,” भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात.

प्राचीन काळापासून आजतागायत या सर्व साधना गुरु-शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या. परंतु, तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. योगाचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहिती होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजही होते. योगाच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनांविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरूकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करावे हा जागतिक योग दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या योगदिनाच्या पार्शवभूमीवर योगाचे विविध प्रकार, योगासने करण्याची योग्य पध्दत आणि त्याचे महत्व आपल्या समाजमाध्यमावरील चॅनेलद्वारे प्रसारित केले आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत योगदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि जागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाने प्रेरित होवून लता दररोज योगाभ्यास करू लागली. यामुळे लताची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती मजबूत आणि जास्त सकारात्मक झाली. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या स्वास्थ्यासाठी दिल्यास अनेक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते हेही लताच्या लक्षात आले. त्यानंतरलता स्वतःदेखील गावातील अनेक महिलांना योगाभ्यासाचे महत्व पटवून देऊ लागली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button