जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । जून महिना संपायला आता अवघे दहा दिवस राहिले. तरी देखील यंदा वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने राज्यात म्हणावी तशी हजेरी लावली नाहीय. राज्यातील बहुतांश भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आज राज्यात वातावरण कसं असेल याबाबतची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सुट्टीवर गेलेला मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झाला असून आज काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, असा इशारा आयएमडीने दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
तर, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.याशिवाय हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आ आहे.या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगावात मुसळधार पाऊस कधी?
जळगावात सध्या ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी बरसात आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच २३ आणि २४ जूनला दुपारी व सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमान ३८.७ अंशांवर असले तरी उकाडा मात्र काही कमी झालेला नाही.