जळगाव । जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची अडीच वर्षाची मुदत संपली आहे. नवीन निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १८ मार्चला निवड केली जाणार आहे. दरम्यान, महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे आज अर्ज घेण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी आदींची उपस्थिती होती.
दीपक सूर्यवंशी व भगत बालाणी यांनी या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होणार असून माजी मंत्री आ. गिरीश महाजन व आ राजूमामा भोळे हे ठरवतील त्यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले. तर पक्षात यावरून कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर पद ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे. तर उपमहापौरपद सर्वसाधारण खुले होते. आताही तीच स्थिती आहे. सद्यस्थितीत महापौरपदी भारती सोनवणे; तर उपमहापौर पदी सुनील खडके आहेत.
जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून त्यांचे ५७ नगरसेवक आहेत. तर विरोधी पक्षातील शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन नगरसेवक आहेत. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी भाजपतर्फे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी महापौर व उपमहापौर पदाचे प्रत्येकी चार चार असे आठ अर्ज घेतले. तर गटनेते भगत बालाणी यांनी देखील यांनी महापौर व उपमहापौर पदाचे प्रत्येकी चार चार असे आठ अर्ज घेतले. दोन्ही पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत १७ मार्च रोजी दुपारी २ वाजेची आहे. तर माघारीची मुदत ही १८ रोजी अर्ज छाननीनंतर १५ मिनिटांचा राहणार आहे.