⁠ 
सोमवार, मे 6, 2024

अंजनी प्रकल्पामध्ये ५० टक्के जलसाठा; खरीप पिकांसाठी मात्र पावसाची प्रतीक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या अंजनी प्रकल्पामध्ये सुमारे ५० टक्के जलसाठा झाल्यामुळे आगामी काळातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. अंजनी प्रकल्पात पन्नास टक्के साठा झाला असला तरी तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस नसल्यामुळे खरीप पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे, मात्र प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या तीन गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊ शकत नाही.प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यास एरंडोलसह धरणगाव तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच पाण्याची समस्या निर्माण झाल्यास धरणगावसह तालुक्यातील गावांसाठी देखील अंजनी नदीच्या पात्रात प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात येते.

प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा असल्यास रब्बी पिकांसाठी देखील पाणी सोडण्यात येते. यावर्षी पावसाळा सुरू होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून, तालुक्यात अद्यापपर्यंत समाधानकारक पाउस झालेला नाही. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होतो किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंजनी प्रकल्पात अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात जोरदार पाऊस झाल्यास पाण्याची आवक होत असते.

अंजनी प्रकल्पाच्या अगोदर सुमारे चौदा लहान बंधारे असून, ते पूर्ण भरल्यानंतरच प्रकल्पात पाण्याची आवक होत असते. सद्यस्थितीत प्रकल्पात सुमारे पन्नास टक्के जलसाठा झाला असला तरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. जोरदार पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

पावसाअभावी अंजनी नदीला अद्यापपर्यंत एकही पूर आलेला नाही. त्यामुळे नदीच्या पात्राची गटारगंगा झाली आहे. सुमारे सहा वर्षांपासून अंजनी प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा होत असल्यामुळे तालुक्यात पाण्याची समस्या निर्माण झाली नव्हती.

अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणात जलसाठा झाल्यानंतर प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नदीकाठावरील विहिरींना त्याचा फायदा होऊन पाण्याच्या पातळीत वाढ होत असते. अंजनी प्रकल्पात पन्नास टक्के जलसाठा झाल्यामुळे शहराची पाण्याची समस्या दूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.