⁠ 
रविवार, मे 19, 2024

खडसेंचा जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा झाला गेम! : हे आहे नेमके कारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । कोणताही नेता आपल्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांची मतं जाणून घेतो. त्यांच्या मतानेच आपले निर्णय घेतो. हीच एखाद्या नेत्याची उजवी बाजू असते. मात्र कित्येकदा पक्षापेक्षा नेता किंबहुना संघटनेपेक्षा एक नेता वरचढ झाला तर संघटना आणि संघटनेसोबत असलेल्या इतर संघटना त्या नेत्याचे ऐकत नाहीत. अशी उदाहरणे आपल्याला कित्येकदा बघायला मिळतात आणि त्याच प्रकारचे उदाहरण आता एकनाथराव खडसे यांच्यासोबत बघायला मिळत असल्याचे म्हटले जात आहे. कारण एकनाथराव खडसे यांच्या जिद्दी स्वभावामुळे जिल्हा बँक हाथातून गेली अश्या चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांना निवडणुकीमध्ये उतरवून नका. त्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवार बनवू नका. उलट संजय पवार यांनाच उमेदवार करा असं कित्येक नेत्यांनी एकनाथराव खडसे यांना सांगितलं. मात्र स्वतःवर असलेल्या आत्मविश्वास आणि सहकार्यांवर असलेल्या विश्वासामुळे एकनाथराव खडसे यांनी रवींद्रभैय्या पाटील यांनाच अधिकृत उमेदवार जाहीर केलं. ऐन वेळेस जे व्हायचं तेच झालं पक्षांतर्गत किंवा पक्षाच्या सोबत असलेल्या कुणीतरी बंडखोरी केली आणि संजय पवार यांना मतदान केलं.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे हे ‘मी’ किती मोठा नेता आहे. हे वेळोवेळी सांगत आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना देखील ते ‘मी’ हा शब्द कित्येकदा मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. त्यांचा हाच ‘मी’ पणा त्यांना घातक ठरत असल्याच्या चर्चा सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात आहेत.

एकनाथराव खडसे भारतीय जनता पक्षामध्ये असताना खडसेंमध्ये ‘मी’ पणा नव्हता असं नाही. मात्र वरिष्ठानच्या आदेशाचे पालन खडसे तंतोतंत करत होते. यामुळे खडसेंना वरिष्ठ कधीही थांबवण्याच्या प्रयत्न करत नसत. तर संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहायचे. वरिष्ठांच्या सांगितल्यामुळे संपूर्ण पक्ष हा एकनाथराव खडसे यांच्यासोबत उभा रहायचा.

कारण पक्षातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माहीत होतं की एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षासाठी खरंच खूप त्याग केला आहे. याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये एक शिस्त आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ना ती शिस्त आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खडसेंसोबत नाळ जोडली गेली आहे.

यामुळे अंतर्गत कलहामुळे एकनाथराव खडसे यांचा सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये घात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. तर याच बरोबर एकनाथराव खडसे यांनी येत्या काळात त्यांचा ‘मी’ पणा किंबहुना एकाधिकारशाही थांबवली नाही तर पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. यामुळे एकनाथराव खडसे हे या क्षणाला तरी जिल्ह्याची आणि राष्ट्रवादीचे बडे नेते जरी असले तरी त्यांचा स्वभावात त्यांनी योग्यवेळी बदल केला नाही. तर एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीचे ‘ज्येष्ठ नेते’ होतील असेही म्हटले जात आहे.