फैजपूर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीत ४ जागा बिनविरोधी
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील फैजपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीत १३ पैकी ४ जागा बिनविरोध निवड करण्यात आली असून उर्वरित ९ जागांसाठी मतदान होणार आहे.
फैजपूर येथील विविध कार्यकारी सोसायटीत होऊ घातलेल्या पंचवार्षीक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या एकून चार जागा बिनविरोध निवडून आलेले आहे. यात भटक्या विमुक्त जाती गटातून माधव हरी भोई, महिला राखीव गटातून माजी नगरसेविका अनिता अरुण चौधरी, नगरसेविका शकुंतला मोतीराम भारंबे तर ओबीसी राखी या गटात विलास महारु महाजन अशा एकूण ४ जागा शेतकरी विकास पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर उर्वरित ९ जागांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी तीन अर्ज असल्याने माजी नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी यांनी सर्वांच्या विनंतीवरून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महिला राखीव गटातून दोघा जागा बिनविरोध निवडून आल्या. ओबीसी गटात सुद्धा जवळपास ५-६ उमेदवार असून यातील इतर सर्व उमेदवारांनी सर्वांच्या विनंतीवरून अर्ज माघारी घेतल्याने ओबीसी गटातून विलास महारु महाजन यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान उमेदवारांची बिनविरोध निवडबद्दल माजी नगराध्यक्ष पांडूरंग सराफ, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, विकास सोसायटीचे माजी चेअरमन व नगरसेवक केतन किरंगे, नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, मसाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे यांच्यासह विकासोच्या सर्व माजी संचालकांनी अभिनंदन व स्वागत केले.