हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले, तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । सततच्या पावसामुळे हतनूर धरणाचे ४१ दरवाज्यांपैकी ३६ दरवाचे पूर्ण उंचीने उघडलेले आहेत. तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 41032 क्युसेस इतका विसर्ग सुरू असून आज संध्याकाळी 80 हजार क्सुसेस ते 1 लाख 25 हजार क्युसेस पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून होण्याची शक्यता आहे. तापी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन जळगाव व कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदी काठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नाले, ओढे काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारेपासून सावध राहावे, असेही जळगाव जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.