जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३०० कोटींची तातडीची मदत; लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होणार

ऑक्टोबर 19, 2025 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली मात्र दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप न झाल्याने सरकारवर टीका केली जात होती. यातच जळगाव जिल्ह्यासाठी शनिवारी सुमारे ३०० कोटींची तातडीची मदत जाहीर झाली. हा निधी डीबीटी पोर्टलमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, त्याचे वितरण दिवाळीच्या सुट्टीतही तहसील कार्यालयांकडून केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

affected by heavy rains

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे जळगाव जिल्ह्यात तब्बल ३,२५, ३५९ शेतकऱ्यांचे सुमारे २ लाख ४७ हजार हेक्टर शेतीक्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने ९ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार, नैसर्गिक आपत्तीच्या विशेष मदतीचे पॅकेज आणि अनुषंगिक सवलती देण्यासाठी जिल्हानिहाय तालुक्यांची यादी जाहीर केली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुके नैसर्गिक आपत्तीने बाधित झाल्याने दाखविण्यात आले. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नव्हती.

दिवाळी दारात आल्यानंतरही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नैसर्गिक आपत्तीची कोणतीच मदत जमा झाली नाही. यातच बाधित शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी अखेर शासनाने शनिवारच्या जीआरनुसार २९९ कोटी ९४ लाख ४७ हजार रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्याचे वितरण तातडीने करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

प्रति हेक्टरी १० हजार अतिरिक्त
दरम्यान, शासनाने जाहीर केलेली आताची ही मदत फक्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील प्रति हेक्टरी १० हजार रुपये अतिरिक्त मदत वेगळी देण्यात येणार आहे. दिवाळी आणि सुट्टीच्या काळातही तहसील कार्यालयांमधील मदत वितरणाचे काम सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असा दावा करण्यात आला आहे. हा निधी डीबीटी पोर्टलमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now