जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकावर गोळीबार केल्या प्रकरणातील पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या दोघांनी ज्यांच्याकडून हे गावठी कट्टे घेतले त्याच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला असता घरात त्यांच्या घरात १ गावठी कट्टा व २ जीवंत राऊंड मिळून आले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावठी पिस्तुल व जीवंत काडतुसे आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना?
चाळीसगाव शहरात १९ डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन भागातील गोळीबार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी दीपक सुभाष मरसाळे रा. सुवर्णाताई नगर व अतुल गोकूळ कसबे रा. इंदिरा नगर, बस स्थानकमागे यांना पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी व गोपाल पाटील यांच्या पथकाने शिताफीने सापळा रचून धुळे रोड परिसरातून अटक केली.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी आरोपी लक्ष्मण प्रथमेश भामरे व अमीर शेख शमशोद्दीन शेख दोन्ही रा. नागदरोड यांच्याकडून वापरलेले गावठी कट्टे घेतल्याचे सांगितले. या माहितीवरून शहर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता प्रथमेश भामरे याच्या घरातून १ गावठी कट्टा व २ जीवंत राऊंड मिळून आले. त्याच्या विरोधात हवालदार मोहन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.









