चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात ; 3 मजूर ठार, सहा ते सात गंभीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून अशातच चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावानजीक भीषण अपघात झाला असून यात ३ मजूरांचा मृत्यू झाला आहे. मजुरांना घेऊन घराकडे जाणाऱ्या डंपर आणि पीकअप यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला.
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचे काम सध्या सुरू आहे. या लाईनवर तळेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे जात असताना चाळीसगावकडून नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडी व डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की डंपर जागेवरच उलटला. यात डंपरमधील काही मजूर फेकले गेले, तर काही डंपरखाली दाबले गेले.
अपघातात एका महिलेसह एक जागीच ठार झाले होते. तर अन्य माजू जखमी झाले. तसेच एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी मदतकार्य करण्यासाठी धावले. नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातात सहा ते सात मजूर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते.