⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जिल्हा परिषदेच्या शाळा सुधारणीसाठी ३ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर; ‘या’ शाळांची होणार सुधारणा

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांच्या जिल्हा परिषद शाळांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते, तसेच अनेक जिल्हा परिषद शाळांना नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची अनेक वर्षांपासून मागणी होती. या अनुषंगाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने ३ कोटी ८२ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून तालुक्यातील २८ गावांमधील जिल्हा परिषद शाळांना २६ नवीन वर्गखोल्या व २२ वर्गखोल्या दुरुस्ती केली जाणार आहे.

गुजरदरी गावामध्ये उघड्यावर शाळा भरते म्हणून आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून, जिल्हा परिषद शाळेला ३ नवीन वर्गखोल्या मिळणार आहेत. जिल्हा परिषद शाळांची गावे व मंजूर झालेल्या नवीन वर्गखोल्या याची क्रमवारी अशी : गुजरदरी ३, मेहुणबारे उर्दू १, ओढरे २, घोडेगाव २, शिवापूर २, उपखेड ४, नवे तीरपोळे १, गणेशपूर ४, दरेगाव १, पिंपरखेड मराठी १, मांदुर्ण १, वाघळी २, गणेशपूर २, अशा एकूण २६ वर्गखोल्यांसाठी ३ कोटी १५ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आमदार चव्हाण यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाच्यावतीने, खोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी देत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार चव्हाण यांनी आभार मानले आहेत. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.

वलठाण पाटे, पिंपळवाडी तांडा, विसापूर, बोढरे, रांजणगाव उर्दू, पिंजारपाडे, जामदा, रांजणगाव बॉ., शिवापूर, बाणगाव, पिंप्री खुर्द, सांगवी, बोरखेडा खुर्द, खरजई, टेकवाडे बुद्रुक, शिंदी, पातोंडा कन्या, पातोंडा बॉ., नवे तिरपोळे, वाघळी उर्दू, मुंदखेडा बुद्रुक, तळोदे प्र.चा. या एकूण २२ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ६६ लाख मंजूर झाले आहे.