यंदा साजरा होणार श्रीराम रथोत्सव, असे असणार स्वरूप
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । ग्रामदैवत श्रीराम मंदिराच्या रथोत्सवासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी रथमार्गाची पाहणी केली. त्यानंतर रथोत्सवाच्या आयोजनाबाबत श्रीराम मंदिरात बैठक झाली. त्यात रथोत्सवाचे स्वरूप कसे असेल, यावर चर्चा करण्यात आली व यंदा हा उत्सव मर्यादीत स्वरुपात करण्याचे ठरले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे रथ फक्त पाच पावले ओढण्यात येऊन पूजा करण्यात आली होती. यंदादेखील रथोत्सव मर्यादित स्वरूपातच साजरा केला जाणार आहे. त्यासाठी रथमार्गाची पाहणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आमदार सुरेश भोळे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा उपायुक्त श्याम गोसावी यांनी केली. यावेळी श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, विश्वस्त भरत अमळकर, मुकुंद धर्माधिकारी, नंदू शुक्ल, विलास चौधरी, बजरंग दलाचे राकेश लोहार, रा.स्व. संघाचे कवी कासार, डॉ. विरण खडके, अमित भाटिया, राजू काळे, अरुण मराठे, भानुदास चौधरी, राजू कोळी अशोक माळी आदी उपस्थित होते.
अशी चर्चा करण्यात आली
श्रीराम मंदिर संस्थानने केलेल्या विनंती नुसार जिल्हा प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबाबत मंदिरात मंगळवारी बैठकदेखील झाली.
मंदिरात वहनोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपासून वहनांना सुरुवात केली जाते. त्याप्रमाणे वहनांच्या साहित्याची स्वच्छता केली जात आहे. मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे.
यावेळी वहनाची वेळ बदलणार आहे. तसेच वहनोत्सवाला देखील गर्दी होऊ नये, वहनाला आठ वाजता सुरुवात करण्यात यावी, ज्यांच्याकडे आरती केली जाते तेथे भारुड न करण्याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
...असा असेल रथमार्ग
स्थाचा मार्ग श्रीराम मंदिरापासून आंबेडकर नगर, चौधरी वाडा, सुभाष खडके यांच्याकडे पानसुपारी कार्यक्रम, तेली चौक, राममंदिर, जामा मशिद, रथ चौक, बोहरा बाजार, सुभाष चौक, दाणा बाजार, साने गुरुजी चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, भवानी मंदिर, भिलपुरा चौक, लालशाह बाबा यांच्या दयवर चादर चढवल्यावर शनिपेठ पोलीस चौकी, बालाजी मंदिर, रथ चौक येथे समाप्ती होणार.
असे असतील नियम
गर्दीचे नियंत्रण श्रीराम मंदिर रथोत्सव समितीला करावे लागणार आहे. श्रीराम रथासोबतच १०० ते १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी नसावी, रथाच्या मिरवणुकीची वेळ ११.३ ते ५.३० ही असेल. रथ उत्सव समितीने वेळेची मर्यादा पाळावी, रथ सुरु झाला की फक्त पानसुपारीसाठी थांबेल. रथ सुरु असताना आरती करण्यास आणि प्रसाद वाटण्यास बंदी घालण्यात आली आहे. भजन, भारुड, बॅण्ड, पथनाट्य, सोंगे यांना पूर्ण बंदी आहे. भाविकांनी स्थाजवळ गर्दी न करता लांबूनच दर्शन घ्यावे,