लसीकरण शिबिरात गोंधळ
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ ।उपलब्ध लसींचा साठा हा कमी आल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सौ. सुमित्राताई महाजन यांच्या संकल्पनेतून व खान्देश युथ ऑर्गनायझेशनच्या संयोगाने आयोध्या नगरातील रायसोनी शाळेत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
आयोध्या नगरातील बी. यु. रायसोनी शाळेत सौ. सुमित्राताई महाजन यांच्या संकल्पनेतून व खान्देश युथ ऑर्गनायझेशनच्या संयोगाने एक दिवसीय भव्य लसीकरण मोहिमेचे आज दि. २५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेला परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. येथे सकाळी ७ वाजेपासून परिसरातील नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली. मात्र, दुपारचे दोन वाजले तरी आपला नंबर लागला नाही म्हणून लसीकरण करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळाला. काहींनी तर ऑनलाईन बुकिंगमध्ये दिलेल्या निर्धारित वेळेत आपणास लसीकरण करण्यात आले नसल्याची तक्रार केली आहे. लसीकरण होत नसल्याने केंद्रावर गोंधळ उडाला होता. तर सौ. सुमित्राताई महाजन यांनी आम्ही सामाजिक भावनेतून हे कार्य करत असून आम्हाला केवळ ३५० डोस उपलब्ध झाले असल्याचे नागरिकांना सांगितले. दरम्यान, आज महापालिकेतर्फे छत्रपती शाहूमहाराज रुग्णालय व चेतनदास मेहता हॉस्पिटल या केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.