---Advertisement---
जळगाव जिल्हा यावल विशेष

यावल मधील २१ भिल्ल क्रांतीकारकांना झाली होती काळ्यापाण्याची शिक्षा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ फेब्रुवारी २०२३ | अंदमान म्हटले की कोणालाही प्रथम आठवण होते ती महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. अंदमान जेलमधील शिक्षेला काळ्यापाण्याची शिक्षा देखील म्हटले जात असे. १८५७ सालच्या बंडा नंतर इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणार्‍या भारतीय स्वतंत्रता संग्रामातील क्रांतीकारकांना बंदी बनवून अंदमान येथे पाठविले जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समवेत अनेक देशभक्त क्रांतीकारकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. मात्र तुम्हाला माहित आहे का, खान्देशातील २१ क्रांतीकारकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. विशेष म्हणजे सर्व २१ क्रांतीकारक जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील होते!

thabnail Kala pani New jpg webp webp

ब्रिटिश सत्तेच्या दृष्टीकोनातून जे त्रासदायक क्रांतीकारक असत त्यांना ते अंदमान येथील सेल्युलर जेल मध्ये त्यांची रवानगी करत असत. इतिहासात महत्वाची नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे खान्देशातील ज्या २१ क्रांतीकारकांना अंदमानच्या तुरुंगात पाठविण्यात आले. ते सर्वच्या सर्व यावल तालुक्यातील होते. खान्देशातून २९ ऑक्टोंबर १८५८ रोजी २१ कैद्यांना अंदमानला पाठविण्यात आले. ते सर्व यावल तालुक्यातील असल्याचे नोंदींवरुन दिसून येते.

---Advertisement---

सात लाखाची लूट आणि अंबापाणीची लढाई
उत्तर भारतात १८५७ चे स्वातंत्र्य युध्द सुरु झाले. या स्वातंत्र्य युध्दाच्या बातम्या खान्देशात धडकल्यानंतर खान्देशातील जनतेतही ब्रिटिशांविरुध्द रोष उफाळून आला. त्यावेळी सर्वांत प्रथम खान्देशातील भिल्लांनी ब्रिटिश सत्तेविरुध्द उठाव केल्याच्या नोंदी इतिहासात आढळून येतात. काजीसिंग, भिमा नाईक, मेवासिया नाईक, खाज्या नाईक आदि भिल्ल नेत्यांनी खान्देशात इंग्रजांविरुध्द बंडाचे निशान उभारले. १८५७ मध्ये काजीसिंग व भीमा नाईक या दोन भिल्ल नेत्यांनी एकत्र येत सुमारे दीड हजार भिंल्लांची पलटण उभारली. १७ नोव्हेंबर १८५७ रोजी इंदूरकडून ब्रिटीश खजिना मुंबईकडे जाता होता. सेंधवा घाटात भीमा नाईक व काजीसिंग यांनी हा खजिना लूटला. भिल्लांनी हा खजिना लुटून ब्रिटिशांच्या सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. यानंतर भिल्लांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिशांनी जंग जंग पछाडले, पण ब्रिटिशांना यश आले नाही. ब्रिटिश आणि भिल्लांचा रक्तरंजित संघर्ष म्हणजे, अंबापाणीची लढाई!

आंबापाणी हे गाव यावल तालुक्यात असून जळगाव पासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. या गावात ११ एप्रिल १८५७ रोजी ब्रिटिश सैन्य व भिल्लांच्या पलटणीत जोरादर युध्द झाले. यात ब्रिटिश सैन्याचे मोठे नुकसान झाले. भिल्ल सेनेपैकी ६५ भिल्ल मारले गेले व १७० जखमी झाले. या लढाईत काजीसिंगचा एकुलता एक मुलगा पोलादसिंग यासह ७२ जणांना पकडले त्यापैकी ५५ जणांना ११ एप्रिल १८५८ ला संध्याकाळी सामुदायिक मृत्युदंड देऊन गोळया घालून ठार केले होते. १२ एप्रिल रोजी उरलेल्या १७ जणांना अशाच प्रकारे गोळया घालून ठार करण्यात आले. अशी नोंद हिस्ट्री ऑफ खान्देश या रिसर्च जर्नलमध्ये प्रा.डॉ. दिनेश रामदास महाजन यांच्या ‘यावल तालुक्यातील आदिवासींचे ब्रिटिश सत्तेविरुध्द लढे (१८५७-१८५८)’ या रिसर्च पेपरमध्येही करण्यात आली आहे.

हिस्ट्री ऑफ खान्देश या रिसर्च जर्नलमधील नोंदी नुसार, १८५८ मध्ये यावल भागातील पारशी फौजदाराच्या अत्याचाराला कंटाळून तेथील भिल्लांनी सशस्त्र उठाव केला. शिरपूर, यावल, पाचोरा, सुलतानपूर आदी तालुक्यात भिल्लांचा वर्षभर धुमाकूळ चालू होता. भिल्ल क्रांतीकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी पूर्ण ताकद पणाला लावली. ब्रिटिशांनी भिल्लांचा इतका धसका घेतला होता की, पकडलेल्यांना थेट अंदमान बेटावर पाठविण्यात आले. १८६० पर्यंत या बेटावर पाठविलेल्या महाराष्ट्रातील १४८ कैद्यांची नावे डॉ.निवास साठे यांनी १८५७ चे अंदमान काळे पाणी या ग्रंथात दिली आहोत. यात खान्देशमधील २१ कैद्यांची नावे आढळतात. तर नाशिक १५, अहमदनगर ७ , कोल्हापूर १७, कोकण ३४ व पंरपूर येथील ४ असे कैदी तेथे पाठविलले दिसतात.

अंदमानला काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आलेली यावल तालुक्यातील २१ भिल्ल क्रांतीकारकांची नावे खालील प्रमाणे,
१ अधुरीआ
२ अर्जून
३ भाई खान
४ भिकारी
५ भिमाजी
६ भुत्या
७ दामा
८ धर्मा
९ जयसिंग
१० खैरान
११ म्हारु
१२ मोहन
१३ नरसिंग
१४ नासीर
१५ रामा
१६ रायसिंग
१७ गोपाळ साळवी
१८ संदू
१९ सुका
२० सुप्य्रा
२१ वझी

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---