शाळा पुन्हा गजबजल्या ! जिल्ह्यात २ हजार ५६३ शाळा सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट आजपासून पुन्हा एकदा ऐकण्यास मिळणार आहे. शासनाने मान्यता दिल्यानंतर ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग आज बुधवारपासून सुरू होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण २ हजार ५६३ शाळा सुरू
जळगाव जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या एकूण २ हजार ५६३ शाळा आजपासून सुरू होत आहेत. त्यात शाळांत ३ लाख १ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशित आहे. यात इयत्ता पहिलीचे ६८ हजार ९७१, दुसरीचे ७५ हजार ८६९ तर इयत्ता तिसरीचे ७९ हजार १३७, चौथीच्या ७७ हजार ६८८ विद्यार्थी आहेत. शाळा सुरू करण्याबाबत पालकांची संमती घेण्यात आली. दोन महिने पूर्वतयारी करून घेतली जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोना संकटामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आल्याने शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेत १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. परंतु, मुलांना पाठविण्यासंदर्भात पालकांचे संमतिपत्र बंधनकारक आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांनंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांमध्ये उत्साह आहे. शाळा सुरू होणार असल्या तरी अद्यापही कोरोनाचे सावट असल्याने शाळांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने बहुतांश शाळांनी वर्ग खोल्यांचे सॅनिटायझेशन पूर्ण केले आहे. तर काही शाळांमध्ये साफसफाई, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू होती. दोन वर्षानंतर प्राथमिकच्या शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. वर्गांमध्ये चिमुकल्यांचा उडणारा गोंधळदेखील आता सुरू होणार आहे.
एक दिवसाआड वर्ग
कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या अनुषंगाने सावधानता म्हणून काही नियमावली आखून दिली आहे. त्या दृष्टीने शाळांनी नियोजन केले आहे. तर काही शाळांनी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलविण्याचे नियोजन केले आहे. अर्थात हजेरीपटानुसार पहिल्या वीस क्रमांकाचे विद्यार्थींसाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, गुरूवार व शनिवार असे दिवस ठरवून दिले आहे.