जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२५ । चोपडा तालुक्यातील मौजे बोरअजंटी येथे राखीव वनकक्ष क्र. २३६ च्या हद्दीत वनविभाग व पोलीस दलाच्या संयुक्त गस्तीदरम्यान २ जणांकडून काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली. वांग्या पुसल्या बारेला (वय ४८, रा. टाक्यापाणी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. बोरखेडा, ता. धरणगाव) व धुरसिंग वलका बारेला (वय ४५, रा. वरुड, जि. खरगोन, ह.मु. पळासखेडा) असं अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज १७ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर, वनपाल बोरअजंटी, परिमंडळ व रेंज स्टाफ तसेच पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान, स्प्लेंडर प्लस (MP-10/NC-4857) मोटरसायकलवरील दोन व्यक्तींना अडवून तपासणी केली असता पिवळ्या गोणीत काळवीटाचे २ शिंगे व सुमारे २ कि. ग्रॅ शिजवलेले मांस आढळून आले. सदर दोन्ही इसम ताब्यात घेण्यात आले.

तपासा दरम्यान त्यांनी काळवीटाची शिकार केल्याची कबुली दिली. याप्रकरणी प्र.रि.क्र. ०३/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवून काळवीटाचे शिंगे, मांस, मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांनी सांगितले की, “वन्यजीव शिकार करणे, त्यांचा अधिवास धोक्यात आणणे हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ चे उल्लंघन असून, सदर गुन्हा अजामीनपात्र व दखलपात्र स्वरूपाचा आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपर्यंत कारावास आणि २५,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.”
सदर कारवाई मा. वनसंरक्षक (प्रा.) धुळे, उपवनसंरक्षक यावल, विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (चोपडा), वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर, पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण व त्यांच्या पथकांनी केली.









