⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर ; जळगाव जिल्ह्यातून 15600 अर्ज प्राप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे आहे. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावा यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व ,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे करिता तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र ,योगोउपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून रुपये ३ हजार त्यांना मिळणार आहे. पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड ,स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगा उपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.

नाशिक विभागातून सदर योजनेसाठी 17468 ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केल्या असून त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे जळगाव जिल्ह्यातून 15600 प्राप्त झाले आहेत तर नाशिक जिल्ह्यातून 1300 व अहमदनगर जिल्ह्यातून 634 ज्येष्ठांचे अर्ज प्राप्त झाले आहे. सदर योजनेची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ,उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत “माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते त्या सर्वेक्षणाबरोबरच या योजनेचा लाभार्थींची तपासणी करण्यात येत आहे.

महानगरपालिकास्तरावर आयुक्त महानगरपालिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण /जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची समिती मार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी वरील सर्व संबंधित कार्यालयात संपर्क साधावा. ३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाची ६५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्याच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.