जळगाव लाईव्ह न्यूज | २५ मे २०२३ | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी (दि.२५) दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर झाला. जळगाव जिल्ह्यातून ४६ हजार ४५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ४३ हजार ३२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९३.२६ टक्के इतका लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.५५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.६१ इतकी आहे. विद्यार्थ्यांना बारावीची गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र त्यांच्या शाळा महाविद्यालयामार्फत ५ जून पासून दुपारी तीन नंतर वितरित करण्यात येतील.
परीक्षेला जळगाव जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून २२ हजार १५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २१ हजार ७२० जण उत्तीर्ण झाले असून त्यात १३ हजार ३८६ मुलं व ८ हजार ३३४ मुलींचा समावेश आहे. त्यांची टक्केवारी ९६.८४ इतकी आहे. कला शाखेत जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या १६ हजार ९४४ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ८४. ०१ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून परीक्षेला बसलेल्या ५ हजार ५५० विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ३१९ जण उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ९४ टक्के लागला आहे. व्होकेशनलचा निकाल ८५.९६ टक्के तर टेक सायन्सचा निकाल ९२.८५ टक्के लागला आहे.
तालुकानिहाय निकाल खालील प्रमाणे
अमळनेर ९५.८९ टक्के
भुसावळ ९३.७१ टक्के
बोदवड ८७.३९ टक्के
चाळीसगाव ९२.१९ टक्के
चोपडा ९४.४३ टक्के
धरणगाव ९२.६६ टक्के
एरंडोल ९०.९४ टक्के
जामनेर ९१.६३ टक्के
मुक्ताईनगर ९५.३७ टक्के
पारोळा ८८.६४ टक्के
पाचोरा ९४.९८ टक्के
रावेर ९०.८७ टक्के
यावल ९४.६६ टक्के
जळगाव शहर ९५.१५ टक्के
राज्यातही मुलींचीच बाजी
१४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची ९१.२५ टक्के एवढा आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे.
गुण पडताळणीसाठी २६ मे पासून करा अर्ज
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने (http://verification.mhe hsc.ac.in) या संकेतस्थळावरून स्वत: तसेच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.