जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गहाळ झालेले ११ मोबाईल हस्तगत करत मूळ मालकांना परत केले. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.

ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये चालू वर्ष आणि सध्याच्या काळात गहाळ झालेल्या मोबाईल संबंधित बऱ्याच तक्रारी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या होत्या. अनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी यशस्वी तपास करून एकूण किंमत १,१०,००० रुपये किमतीचे ११ मोबाईल हस्तगत केले. आणि ५ डिसेंबर रोजी संबंधित मोबाईल धारकांना ताब्यात देत परत केले.

या कामगिरीसाठी पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आणि चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येतील तंत्रज्ञांचे सहकार्य घेतले. उपस्थित असलेल्या पोलिसांनी आपल्या कार्यासंबंधीची तपशीलवार माहिती देत यशस्वी कारवाई केली आहे. गहाळ झालेले मोबाईल हे मोबाईल धारकांच्या ताब्यात दिल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले. दरम्यान मोबाईल हरवल्यानंतर लोकेशन ट्रॅक करा, लगेच पोलिसांत तक्रार नोंदवा आणि सीइआयआर पोर्टलवर फोन ब्लॉक करा, सिम कार्ड ब्लॉक करून नवीन घ्या. आणि सर्व ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड बदला, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









