जळगाव लाईव्ह न्यूज । 3 डिसेंबर २०२२ । कोरोनाचे संकट पूर्णपणे संपत नाही तोच आता गोवरच्या साथीने डोकं वर काढले आहे. राज्याभरात सुरु झालेल्या गोवरने जळगाव शहरात एन्ट्री केली आहे. शहरात ११ रुग्ण आढळून आले असून त्यास महापालिकेच्या दवाखाना विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम लावलाणी यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे महापालिका आरोग्य विभाग अलर्टवर आला आहे. जळगाव शहरात गोवरचे रुग्ण आढळून आले असले तरी नागरिकांना घाबरुन न जाता तातडीने आपल्या लहान मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोवरची लक्षणे
गोवर हा मुख्यत लहान मुलांमध्ये आढणारा संसर्गजन्य आजार आहे. शरीरात एकदा विषाणुप्रवेश झाला की ८ ते १२ दिवसांनी लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला, डोळे लाल होणे आदी लक्षणे दिसून येतात. या काळात मोहरीएवढे गुलाबी लालसर ठिपके अंगावर दिसून येतात. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसर्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. या आजारांमध्ये उद्भवणार्या अतिसार, न्युमोनिया आणि मेंदू संसर्ग या सारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ शकतो.
गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बर्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये श्वासनलिकेला सूज येऊन बालकांना श्वसनाला त्रास होण्याची शक्यता असते. ताप व तापात येणारे झटके कधीकधी मेंदूच्या आवरणांना सूज येऊन कोमामध्ये जाण्याचा धोका काही बालकांमध्ये दिसून येतो.
महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्टवर
शहरातील विविध भागांत गोवर आजारापासून बाधित असलेल्या रुग्णांची तपासणी सुरू आहे. या भागात रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी महापालिकेने आधीच शहरातील स्लम भागात तपासणी सुरू केली आहे. शहरातील जमुनानगर, चंदूअण्णानगर, जोशी कॉलनी, शनिपेठ, तांबापुरा, समतानगर या भागांत गोवरचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. या परिसरात घरोघरी आशा सेविकांमार्फत तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच सर्व धर्मगुरू, पंडित, पुजारी, मौलाना, पादरी यांनीही आपल्या परिसरातील लहान मुलांचे लसीकरण करून घेण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोवरपासून ८ वर्षांखालील बालकांचे संरक्षण करायचे आहे. ताप येणे, पुरळ येणे, खोकला, डोळे लाल होणे, नाकातून पाणी येणे ही लक्षणे दिसताच जवळच्या वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.