⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

१०८ रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार, १ दिवसाच्या चिमुकल्याच्या जिवाशी खेळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२१ । शहरातील एक दिवसाच्या बाळाच्या पोटात गाठ झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. जळगाव जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला औरंगाबाद रूग्णालयात हलविण्याच्या सूचना केल्या परंतु रुग्णालयात असलेल्या १०८ रुग्णवाहिकावरील डॉक्टरच बेपत्ता असल्याने चिमुकला तब्बल दहा तास उपचारासाठी ताटकळत होता. रात्री १० वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील रुग्णवाहिका बोलावून बाळाला रवाना करण्यात आले.

जळगाव शहरातील शेख रिजवान शेख शौकत व शाहिस्ता यांच्या १ दिवसाच्या नवजात बाळाच्या पोटात गाठ आढळून आली. जळगाव जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बाळाला औरंगाबाद येथे हलविण्याच्या सूचना केल्या. बाळाचे वडील आणि काका शेख इरफान यांनी जिल्हा रुग्णालयातून १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका संबंधित व्यक्तींनी डॉ.ऊमर देशमुख हे काही वेळात येत असल्याचे सांगितले. दुपारी १२ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांशी संपर्क साधला परंतु कुणीही आले नाही. दिवसभर रुग्णवाहिका रुग्णालयातच थांबून होती.

अखेर शेख यांनी नंतर नशिराबाद येथील १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रात्री ९.३० च्या सुमारास नशिराबाद येथील १०८ रुग्णवाहिका आल्यानंतर नशिराबाद येथील डॉ.खालिद हे रुग्णवाहिकेसोबत बाळाला घेऊन औरंगाबाद येथे रवाना झाले. दुपारी १२ वाजेपासून संपर्क साधत असलेल्या बाळाच्या नातेवाईकांनी या संपूर्ण व्यवस्थेबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला असून बाळाच्या बाबतीत काही अघटीत घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालय प्रशासन, जिल्हा परिषद आणि रुग्णवाहिकेचे व्यवस्थापक याप्रकरणी कोणावर कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.