⁠ 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 10 वर्षाची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्हा न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या योगेश दिनकर कोळी (रा.डांगरी ता. अमळनेर) या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

नेमकं प्रकरण काय?
धरणगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेली अल्पवयीन मुलगी ही नैसर्गिक विधी करण्यासाठी घराबाहेर गेली असता यावेळी आरोपी योगेश दिनकर कोळी याने तिच्या मागून येवून तिचे तोंड दाबत तिला एका जुन्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच जर तू ओरडली तर तुला जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता पीडित मुलगी घरी गेल्यावर. तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानुसार ७ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी योगेश दिनकर कोळी यांच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल करण्यात आले. न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानुसार न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ताराचंद जावळे यांनी काम मदत केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय वकील सुरेंद्र कांबळे यांनी काम पाहिले.