ऐन सणासुदीत प्रवाशांना झटका ; दौंड-मनमाड दरम्यानच्या कामामुळे 10 रेल्वे गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असून यातच रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे. अशात आता दौंड ते मनमाड दरम्यानच्या रेल्वे लाईन दुहेरीकरण कामासाठी रेल्वेने दहा गाड्या रद्द केल्या. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यात भुसावळ मार्गे धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे दौंड-काष्टी, बेलवंडी-बेलापूर, पुणतांबा-कान्हेगाव या दरम्यान शनिवार, 24 व रविवार, 25 सप्टेंबर रोजी हे काम केले जात आहे. दौंड-मनमाड हे 2081 कोटी रुपयांचे दुहेरीकरणाचे काम रेल्वेकडून होत असून पहिल्या टप्यात 102 किमी अंतराचे काम पूर्ण झाले तर दुसर्या टप्यात 134 किमी अंतराचे काम पूर्ण केले जात आहे. दौंड-काष्टी, बेलवंडी-बेलापूर, पुणतांबा-कान्हेगाव तसेच अकोळनेर-सारोळा विभागातील 5.77 किमी अंतराचे दुहेरीकरणाचे काम केले जात आहे.
या गाड्या केल्या रद्द
रद्द होणार्या गाड्यामध्ये जबलपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 23 रोजी जबलपूरहून सुटणार नाही, पुणे-जबलपूर ही गाडी पुण्यातून 25 रोजी सुटणार नाही. दादर-शिर्डी ही दादरहून 23 रोजी तर शिर्डी-दादर ही गाडी 24 रोजी, पुणे-निजामाबाद एक्स्प्रेस आणि निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या 30 सप्टेबरपर्यंत रद्द असतील, पुणे-नांदेड ही गाडी 23 व 24 सप्टेंबर रोजी रद्द तर नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 24 व 25 रोजी रद्द असेल, राणी-कमलापती-पुणे एक्स्प्रेस ही 23 रोजी पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस ही गाडी 24 रद्द असेल. दरम्यान, 12 गाड्यांच्या मार्गातही रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे.