जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जिल्ह्यातील मोठ्यांसह मध्यम व लघु १७ प्रकल्पांपैकी तब्बल ११ प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे. यंदा एकूण धरणांमधील टक्केवारी ८५ टक्क्यांवर गेला असून यामुळे वर्षभराकरिता पिण्याच्या पाण्याचा आणि रब्बी हंगामाच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

खरंतर यंदाच्या मान्सून पावसाने जिल्ह्यात सुरुवातीच्या अडीच महिन्यात म्हणावी तशी हजेरी लावली नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांतील जलसाठ्यात वाढ न झाल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र, गेल्या महिन्यातील १५ ऑगस्ट नंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा काहीसा वाढला होता. परंतु या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

विशेष जिल्ह्यातील एकूण लहान-मोठ्या १७ प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प १०० टक्के फुल्ल भरले आहे. यात अर्ध्या जिल्ह्याची तहान भागविणारे गिरणा धरण देखील शंभर टक्के भरले आहे. तसेच अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नवती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अजनी, बोरी आणि मन्याड ही धरणे १००% भरली आहे. तर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण देखील शंभरी गाठण्याच्या उंबरवठ्यावर आहे. आज सकाळपर्यंत वाघूर धरणात ९९.८८ टक्के इतका जलसाठा होता. येत्या काही तासात वाघूर धरणही शंभरी गाठेल.
जळगाव जिल्ह्यातील मोठ्यांसह मध्यम व लघु प्रकल्पांमधील जलसाठा आज दि. २२ सप्टेंबर रोजी एकूण ८४.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा जलसाठा ८६ टक्क्यांवर होता. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.
अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला
यंदा जिल्ह्यातील प्रकल्पामधील पाण्याची टक्केवारी पाहता या प्रकल्पामधून ज्या-ज्या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या गावांना यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. हाता-तोंडात आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टक्के) (२२ सप्टेंबरपर्यंत)
मोठे प्रकल्प
हतनूर – यंदा ७१.५७ % – गतवर्षी ७२.३५ %
गिरणा – यंदा १००.०० % – गतवर्षी – १०० %
वाघूर – ९९.८८ %– गतवर्षी – १०० %
मध्यम प्रकल्प
अभोरा – यंदा १०० % – गतवर्षी १०० %
मंगरूळ- यंदा १०० % – गतवर्षी १०० %
हिवरा – यंदा १०० % – गतवर्षी ६२. ७३ %
सुकी – यंदा १०० % – गतवर्षी १०० %
मोर – यंदा ९५.१३ % – गतवर्षी ९७.३५ %
बहुळा – यंदा ६९.२८ % – गतवर्षी ६६.२८ %
अग्नावती – यंदा १०० % – गतवर्षी १०० %
तोंडापूर – यंदा १०० % – गतवर्षी १०० %
अंजनी – यंदा ६६.९२ % – गतवर्षी ६६.५९ %
गूळ – यंदा ७७.२५ % – गतवर्षी ८१.२२ %
भोकरबारी – यंदा ५२.०२ % – गतवर्षी ६.०६ %
बोरी – यंदा १०० % – गतवर्षी १०० %
मन्याड – यंदा १०० % – गतवर्षी ७८.१० %
शेळगाव बॅरेज – यंदा १६.३२ %– गतवर्षी ७०.७३ %








