जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । चेन्नई येथील कालिमेडू शहरात काढण्यात आलेल्या रथाचा स्पर्श विजेच्या तारांना झाल्याने रथात विजेचा प्रवाह उतरून १० भाविकांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
चेन्नई वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीत तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील कालीमेडूमध्ये अप्पर गुरुपूजा उत्सव साजरा केला जात होता. यात आज सकाळी मुख्य रस्त्यावरुन पारंपरिक रथ यात्रा काढण्यात आली. शेकडो भाविक यावेळी रथ ओढण्यासाठी उपस्थित होते. या दरम्यान, मोठा गोंधळ उडाला होता. त्याचवेळी विजेची एक तार रथाच्या संपर्कात आली. या तारेतून वीज वाहत असल्यामुळे करंट लागून दोन लहानग्यांसह एकूण दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शॉक लागल्याचं समोर आल्यानंतर गोंधळ उडाला. काही जणांना इलेक्ट्रीक शॉक लागून अनेकजण जखमी झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलिसांनाही कळवण्यात आलं. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत लगेचच बचावकार्य सुरु केले होते.