जळगाव लाईव्ह न्यूज | २३ डिसेंबर २०२२ | जळगाव शहरातील रस्त्यांवर खड्डे का खड्यांमध्ये रस्ता? अशी काहीशी परिस्थिती आहे. अमृत योजना व भुयारी गटारी यासारख्या महत्त्वाच्या योजनामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. रस्त्यांसाठी निधी संदर्भांत अधूनमधून घोषणा होतच असतात. मात्र गत पाच-सहा वर्षांपासून जळगावच्या रस्त्यांचे भाग्य उजाळलेलं नाही. अशातच शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केला.
जळगाव शहरात एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. रस्त्यांच्या विषयावरुन आमदार व महापालिकेच्या पदाधिकार्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होतच असतात. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत आमदार भोळे यांनी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल ३० ते ३५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला, असा दावा भाजपचे महापालिकेतील उपगट नेते राजेंद्र घुगे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. आताही शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. यात शहरातील दहा रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
दहा कोटी रुपयांतून होणार या रस्त्यांची कामे
प्रभाग ११ अंतर्गत नेहरूनगर गट क्रमांक १४६ मधील दीपक सोनवणे यांच्या घरापासून वाघनगर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग १३ अंतर्गत महाबळ चौक ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग ९ अंतर्गत गणपती मंदिर, शिक्षक कॉलनी, परमार्थ निकेतन ते शिंदेनगर आव्हाने रस्त्यापर्यंत, आर. एल. कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग ९ अंतर्गत मानवसेवा शाळेपासून ते अष्टभुजा गेट शिवरस्ता १२ मीटर रस्ता डांबरीकरण, प्रभाग १६ अंतर्गत राठी शाळेपासून ते सिंधी कॉलनी टी पॉईंटपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग ६ अंतर्गत पंचमुखी हनुमान मंदिरापासून ते नानीबाई हॉस्पिटलर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग ७ अंतर्गत आशाबाबा नगरमधील माऊलीनगर येथील रस्ता डांबरीकरण, प्रभाग १२ अंतर्गत मायादेवी नगरपासून ते रोटरी हॉल श्री. चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण.