जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । जिल्ह्यात तब्बल १ लाख ७२ हजार बोगस विद्यार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित आश्रमशाळांमध्ये एकूण १९ लाख बोगस विद्यार्थी असल्याचे खुद्द सरकारनेच सांगितले आहे. खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते, त्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार सुमारे १० टक्के बोगस विद्यार्थी जिल्ह्यात आहेत.
राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित आश्रमशाळांमध्ये २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी याचिका ब्रिजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यावर शासनाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, तब्बल १९ लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळून आले आहेत. यात सर्वाधिक बोगस विद्यार्थी पुणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल जळगाव, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांचा नंबर लागतो.
विद्यार्थ्यांची सर्व आकडेवारी पाहता राज्यातील या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रमशाळांचे संस्थासंचालक, मुख्याध्यापकांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थी बोगस दाखवून राज्य सरकारची मोठी फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाची अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्ता ब्रीजमोहन मिश्रा यांनी केली आहे. बोगस विद्यार्थी प्रकरणात अनेक वर्ष शासनाचा पैसा खाण्याचे आणि त्याचा अपहार करण्याचे काम या माध्यमातून झाले आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
अकोला : ५६, ४७८, अमरावती : ५,१०७, नगर ६०,९५१, नागपूर : १,८४,२६२, नांदेड १,५२, ७२३, औरंगाबाद : १०,६६६, बीड ८,५२८, नंदुरबार : ७२७४६, भंडारा: ४१०८३, बुलडाणा : ९८,४८८, नाशिक : ७०,२५३, उस्मानाबाद : ४४१५, चंद्रपूर : ६९,८५०, पालघर १७,३३५, परभणी : ४,८५४, धुळे : ८५, १५७ गडचिरोली : १८७४ पुणे : २, ४३,५८२, गोंदिया : ४५,४८२, रायगड : ५,३३९, हिंगोली : ५२, ९८६, सांगली : ७,५५०, जळगाव : १,७२,५३४, सातारा: ७,६५६, सिंधुदुर्ग : १,६७४, सोलापूर : १२,९२०, ठाणे : ८१, २२७, जालना : ९०६९, कोल्हापूर : ८८५४, लातूर : ५१०९, मुंबई : ८०,८००, मुंबई उपनगर : ४८३७२, वर्धा ४९,२६२, वाशीम : ४०,०४०