जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात पशुधनावरील लंपी आजाराने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र यातच अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सुकी नदीच्या पात्रात आज सकाळी मेलेले २२ बैल आढळून आले आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आहे. यात अनेक गुरांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एकीकडे प्रशासन लंपीबाबत सतर्कतेचा इशारा देत असतांना आज सकाळी सुकी नदीच्या पात्रात मृत बैल आढळून आले.
काय आहे कारण?
आज सकाळी सुकी नदीच्या पुलावरून नदीच्या पात्रात २२ बैल मृत अवस्थेत दिसून आले आहेत. प्रथमदर्शनी पाहता पुलावरील एखाद्या वाहनातून त्यांना खाली पात्रात फेकून दिले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हे बैल लंपीमुळे मृत झाले की, अन्य कारणाने ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
गुरांची तस्करी?
या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्कर मोठ्या प्रमाणात होत असते. यातील एखाद्या वाहनात गुरे गुदमरून मेली असल्याने त्यांना नदीपात्रात टाकले असावे का? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे, यातील काही गुरांच्या गळ्याला दोराचा फास लागल्याचे दिसून येत आहे.मात्र अजून काहीही निष्पन्न झालेले नाहीये.