जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आपले आंदोलन अजून तीव्र करणार असून १२ दिवस अटकेत राहिल्यानंतर आता १३ व्या दिवशी आपण शेतकऱ्यांसह मुंडन करून सत्ताधारी सरकारचा निषेध करुन तेरावं घालणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंत्याला दोरीने बांधल्याप्रकरणी आ.चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. काल १२ दिवसानंतर सर्वांना जामीनावर सुटका करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार्या शेतकऱ्यांवर विविध गुन्हे दाखल करुन १२ दिवस तुरुंगात डांबून अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली असून यापुढे अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आ.मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.