जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील जनसंपर्क कक्षात “वॉर रूम” उभारण्यासह “खाटा व्यवस्थापन समिती” नेमण्यात आलेली आहे. या वॉर रूम व समितीला गेल्या आठ दिवसात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात गैरसोय दूर झाली आहे.
वॉर रूममध्ये चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिफ्ट पद्धतीने लावण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात दाखल कोविड १९ पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करणे, रुग्णांच्या जेवणासह इतर सुविधांविषयी विचारणा करणे तसेच वॉर्डातील दाखल रुग्णांना देखील या वॉर रूम सुविधेचा लाभ घेता आला आहे. या वॉर रूमचे ८७६७१९९४७६ आणि ८७६७२४०८०१ हे क्रमांक नागरिकांसाठी जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यासह शहरातील व इतर ठिकाणाहून संदर्भित होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी खाटा व्यवस्थापन समिती नेमण्यात आलेली आहे. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर आवश्यक असलेल्या कोविड १९ पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय राखीव आहे. या समितीला गेल्या आठ दिवसात खाटा उपलब्धतेबाबत जिल्हाभरातून विचारणा झाली आहे. त्यामुळे रुग्णांची धावपळ न होता खाटा व्यवस्थापन अचूक पद्धतीने होत आहे. या समितीत ३ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी ९३५६९४४३१४ हा क्रमांक त्यासाठी जारी करण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयात कोविड १९ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण उपचारांती मृत झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी मृत्यू समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. मयत रुग्णांच्या नातेवाईकांना सांत्वन व मदतीसाठी या समितीने गेल्या आठ दिवसात भरीव काम केले असून येथे ४ निष्णात कर्मचारी नेमण्यात आले आहे. या समितीचा ८७६७३२४१३३ हा क्रमांक रुग्णालय प्रशासनाने नागरिकांसाठी जाहीर केला आहे.