जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । राज्य सरकारने सद्यस्थितीत लॉकलाऊन सारखा निर्णय घेतल्याने काही व्यावसायिकांना सूट तर काही घटकांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाजंत्री बँड पथक सारख्या हातावर पोट घेऊन व्यवसाय करणाऱ्या चालक-मालक यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली असून लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर लग्नांमध्ये वाजंत्रीच्या आगाऊ रक्कम (ऍडव्हान्स सुपारी) परत देण्याची वेळ आली.
एका पथकावर 15 ते 16 लोकांचा उदरनिर्वाह होत असताना किमान कमीत कमी लोकांना वाजंत्री व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी त्यांना देखील सोशल डिस्टंसिंग शासनाचे नियम पालन करण्याचा आग्रह कायम ठेवत किमान आठ ते दहा कलाकारांना वाजवण्याची परवानगी शासनाने सहानुभूतीपूर्वक द्यावी. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज प्रशासनाकडे केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्था चाळीसगाव तालुका यांच्या वतीने अनिल साळुंके, विनायक महाजन, रवींद्र खैरनार, प्रकाश राठोड यांच्यासह सुमारे 40 ते 45 गावातील बँड पथक चालक-मालक गायक कलावंत यांनी आज आपल्या मागण्यांचे निवेदन खासदार उन्मेशदादा पाटील यांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिले. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रशासनाकडे या वाजंत्री चालक मालक कलावंत यांची कैफियत मांडली. किमान आठ ते दहा लोकांना सोशल डिस्टंसिंग व कायद्याच्या अनुषंगाने कशी परवानगी देता येईल. या संदर्भात गांभीर्याने विचार करावा या वाजंत्री चालक मालक कलावंत या व्यावसायिकांनी हंगामात ऑर्डर्स सोबत घेतलेला ऍडव्हान्स परत देण्याची वेळ आलेली आहे. अनेक बँड मालक चालकांनी बँकांचे कर्ज व खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय उभा केला आहे त्यांना कर्जाचे हप्ते भरणे अवघड झाले आहे.आपल्या कलावंतांना आपल्यासह कामगारांच्या खर्चाची तजवीज करणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. रितीरिवाजाप्रमाणे वाजंत्री शिवाय कुठलीही लग्न लागत नसताना फक्त कायद्याच्या बडग्यामुळे वाजंत्री व्यावसायिकांना आपली ॲडव्हान्स परत देण्याची वेळ आली आहे आपण किमान कमीत कमी आठ ते दहा कलाकारांना या संदर्भामध्ये कायद्याच्या अधीन राहून परवानगी दिल्यास त्यांच्याही रोजंदारीचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल याकरिता शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रशासनाशी बोलताना व्यक्त केली आहे. निवेदन देण्यासाठी वडाळ्यातील जय शंकर बँड, आनंद बँड करगाव, महारुद्र बँड शेवरी,साई श्रद्धा बँड शिंदी, गजानन बँड खेडगाव,माऊली बँड वाघळी,साई झंकार बँड घोडेगाव, शंभूराजे बँड बोरखेडा, माहेश्वरी बँड चाळीसगाव, गणेश बँड वडाळा, साई मल्हार बँड लोंढे, द्वारकामाई बँड पथक हिंगोणे, साई दर्शन बँड हिंगोणे, दिनेश बँड बँड पथक बोरखेडा, विनय बँड पथक दहीवद, दिपाली बँड पातोंडा, शिव पूजा बँड पथक सेवानगर, जयश्री बँड पथक सेवानगर अशा विविध बँड पथकातील चालक-मालक, गायक कलावंत यावेळी उपस्थित होते.
बँड चालक मालक कलावंतांना अश्रू अनावर : खासदारांनी दिला धिर
याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडताना अनेक बँड चालक, मालक, गायक, कलावंत यांना अश्रू अनावर झाले होते.दादा आमच्या घरात किराणा संसार कसा करावा असा मोठा प्रश्न समोर उभा आहे. आपण आमची कैफियत शासनाकडे मांडावी असे सांगताना अनेक चालक मालकांना हुंदका देणे अवघड झाले होते. या सर्वांना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी धीर देत काळजी करू नका प्रशासनाच्या अटी-शर्तीस अधीन राहून आपण तुमच्या व्यवसायासंदर्भात मार्ग काढू असा विश्वास खासदार उन्मेशदादा पाटील यांनी या बँड चालक मालक कलावंतांना दिला