जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । रुळावर काम करत असलेल्या चार रेल्वे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना रेल्वेनेच चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी चारही रेल्वे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली.
संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावे असून हे सर्व कर्मचारी ट्रॅक मेंटनर या पदावर काम करत होते.

अपघातानंतर कर्मचाऱ्यांना रेल्वेने उडवल्याने संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर लासलगाव रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले.
दरम्यान, या घटनेविरोधात व चालकाविरोधात संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाड्या रोखून धरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, 20 मिनिटानंतर गोदावरी एक्सप्रेस रवाना करण्यात आली. त्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.