बोदवड : दुचाकीस्वार तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । तालुक्यातील भिलवाडा गावातील दुचाकीस्वार तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना भानखेडा-बोदवड रस्त्यावर घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन सुनील सोनवणे (23) हे तालुक्यातील भिलवाडा येथे वास्तव्यास आहेत. 10 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता ते आपल्या मोटर सायकलने भानखेडा ते बोदवड रोडने घरी जात असताना संशयीत वसंता अशोक सोनवणे (रा.भिलवाडा) याने त्याच्या हातातील काठी सचिन यांच्यावर उगारुन त्यांची मोटरसायकल रोडवर अडवली. यानंतर चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील दिड हजार जपये जबरदस्ती काढून घेतले आणि तेथून पळ काढला. लुटीबाबत कुणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.