जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजा बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करावे. असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याची ऑडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून त्यामुळे मराठा समाजात संतापाची तिव्र भावना निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. अशी विकृत मानसिकता असणाऱ्या अधिकाऱ्याला केवळ निलंबित करुन चालणार नाही. तर त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करावे अशी भावना समस्त मराठा समाजाने व्यक्त केली आहे.
मराठा समाजाच्या लोकभावनेची नोंद घेवून बकाले यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. राज्यभरात बकालेंच्या वक्तव्याविरोधात असंतोष असल्याने मुख्यमंत्र्यांनी यावर त्वरीत निर्णय घ्यावा.असेही पत्रात म्हटले आहे.