जळगाव शहर

नेहरू युवा केंद्राच्या वेबिनारमध्ये नागरिकांनी जाणून घेतले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । नोटबंदीनंतर देशात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. गेल्या दोन वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढले असून नागरिकांना सजग करणे आवश्यक आहे. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित ‘डिजीटल बँक’ वेबिनारमध्ये बँक मित्र निलेश पाटील यांनी ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग नागरिकांना समजावून सांगितले.

ऑनलाईन व्यवहार गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात वाढले असून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नागरिकांना जागरूक करण्यासाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे बुधवारी ‘डिजीटल बँक’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वयंसेवक हेतल पाटील यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते. वेबिनारसाठी अतुल चौधरी, चेतन वाणी यांचे सहकार्य लाभले. बँक मित्र निलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. वेबिनारमध्ये ८० पेक्षा अधिक विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग नोंदविला.

बँक मित्र निलेश पाटील यांनी सांगितले की, आपल्यापैकी बहुतांश व्यक्ती गुगल पे, फोन पे, पेटीएम तसेच इंटरनेट बँकिंग सारख्या विविध सेवांचा वापर करतात. बऱ्याच वेळा आपली फसवणूक होते किंवा आपले पैसे कट होतात. बऱ्याच वेळा क्यूआर कोडची अडचण येते. काही वेळेस पैसे आपल्या खात्यातून कापले जातात परंतु समोरील व्यक्तीला भेटत नाही, अशा वेळी आपण कोणती काळजी घ्यावी? या सर्व गोष्टींची तसेच डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड तसेच बँक आपल्याला देत असलेल्या सर्व सेवा सुविधा तसेच शासनाच्या विविध योजना, सुरक्षा विमा योजना या सर्वांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच बँक लोकपाल एक महत्वाची सुविधा असून त्याबाबत बहुतांश जणांना माहिती नाही. नागरिकांनी फसवणूक झाल्यास बँक लोकपालचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाईलवर एखादा फोन आला आणि समोरील व्यक्तीने बोलता-बोलता खात्यातून पैसे काढून घेतले असे प्रकार बऱ्याच वेळा घडतात. आपण फोनवर बोलताना समोरील व्यक्तीने काही सूचना केल्या आणि आपण त्याचे पालन केल्यास ओटीपी न सांगता देखील आपल्या मोबाईलचा ताबा तो व्यक्ती मिळवतो. त्यामुळे एखाद्या अनोळखी कॉलवर ३ मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोलू नये असे बँक मित्र निलेश पाटील यांनी सांगितले. तसेच फसवणूक झालीच तर बँकेचा टोल फ्री क्रमांक, बँक शाखेचे नोडल अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. केंद्राच्या विविध योजना, योजनांच्या नावे होणारी फसवणूक याबाबत देखील त्यांनी अवगत केले.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button