‘घरो घरी तिरंगा’ अंतर्गत मनपा महिला बचत गटांचे 14 ध्वज विक्री केंद्र उभारणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक तथा स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि.13 ऑगस्ट 2022 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी अर्थात हे तीन दिवस केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘घरो घरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जळगाव शहर महानगरपालिकेने विविध महिला बचत गटांना राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ निर्मितीचे कार्य दिले होते. त्यानुसार पंडित दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत जळगाव शहर वस्तीस्तर संग जळगाव महानगरपालिका यांनी संघ स्थानिक गटांमार्फत राष्ट्रध्वजाची निर्मिती केली असून शहरातील नागरिकांना राष्ट्रध्वज सहजतेने उपलब्ध व्हावे याकरिता या संघ स्थानिक गटांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ विक्रीचे महापालिकेतर्फे एकूण 14 ध्वज विक्री केंद्र सुरु केले जाणार आहे. याअनुषंगाने बुधवार, दि.3 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी महापालिकेतील पहिल्या केंद्राचे शुभारंभ जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.सौ.विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्री.श्याम गोसावी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, बचत गटांच्या महिला तथा नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी या ध्वज विक्री केंद्रांवरुन ‘तिरंगा’ खरेदी करावा व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘तिरंगा’ फडकवून भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष अभिमानाने साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.