⁠ 
रविवार, मे 19, 2024

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली चाळीसगाव नुकसानीची दखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 जळगाव लाईव्ह न्यूज | १ सप्टेंबर २०२१ |  शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्ठी व पावसामुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती नेमकी काय आहे, याची माहिती तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून योग्य ती मदत नुकसानग्रस्तांना देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे राजीव देशमुख यांनी सांगितले.

शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीला आलेल्या पुरामुळे नदी परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. अनेक गावांमधील शेती अक्षरशः पाण्याखाली आली होती. माजी आमदार राजीव देशमुख यांनी आज सकाळपासून शहरासह ग्रामीण भागातील नुकसानाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार अमोल यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, नगरसेवक श्‍याम देशमुख, दीपक पाटील, रामचंद्र जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील बामोशी बाबा दर्गा परिसर, हमालवाडी, शिवाजी घाट, बाजारपेठ, दयानंद कॉर्नर, अण्णाभाऊ साठे नगरातील नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. दुकानदारांसह नदीकाठच्या रहिवाशांना शासकीय पातळीवरुन मदतीचे आश्‍वासन दिले. त्यानंतर वाघडू, वाकडी परिसरातील गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर दिला. आजही बर्याच शेतांमध्ये पाणी साचून असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात श्री. देशमुख यांनी तहसीलदारांसह संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन नुकसानाची वस्तुस्थिती सांगितली. दोन्ही मंत्र्यांनी शासनाकडून योग्य ती मदत देण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नेमके किती नुकसान झाले आहे, याची अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित मंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे राजीव देशमुख यांनी सांगितले.