⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

‘उमवि’वर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून राजेंद्र नन्नवरे यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२३ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून राजेंद्र नन्नवरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राजेंद्र नन्नवरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर पणे कार्यरत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य केले आहे.
शिक्षण संपल्यावर पूर्वोत्तर येथील आसाम राज्यात पूर्णवेळ सामाजिक कामासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची काही वर्षे दिली आहेत. काही काळ ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. तसेच मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्येही त्यांनी प्रमुख जबाबदारी घेऊन काम केले आहे.


सध्या विवेकानंद प्रतिष्ठान या शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग करत नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे ते सचिव म्हणून काम पाहतात. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित त्यांचा व्यवसाय असून शारदाश्रम संस्थेचेही ते संचालक आहेत. पर्यावरण हा त्यांचा आवडीचा विषय असून केंद्र सरकारच्या पर्यावरणविषयक समितीमध्येही ते प्रभावीपणे कार्य करीत आहेत.


मागील पंचवार्षिकमध्ये ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर माननीय राज्यपाल नियुक्त सभासद होते. राजेंद्र नन्नवरे यांच्या व्यापक शैक्षणिक अनुभवाचा व कल्पक नेतृत्वाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास आहे.